उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे मार्गदर्शन
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, १९९० च्या दशकात सुरू झालेली बचत गट चळवळ ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरली आहे. १०-२० रुपयांपासून सुरू झालेली बचत आज हजारो महिलांना स्वावलंबी करत आहे. महिलांनी अंगणवाडी पोषण आहार पुरवठा, शिवणकाम, पाककला, आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे.
त्यांनी असेही स्पष्ट केले की, महिलांना व्यवसाय सुरू करताना प्रशिक्षण, मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बँकांशी समन्वय साधणे ही जबाबदारी शासन आणि सहकारी संस्थांची आहे. मुंबै बँकेसारख्या संस्थांनी यामध्ये पुढाकार घेणे अत्यंत स्वागतार्ह आहे, असे त्या म्हणाल्या. यासोबतच, व्यवसाय कल्पना गोळा करून त्यावर आधारित प्रकल्प पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.
मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे गटनेते मा. ना. प्रवीण दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेने घेतलेले उपक्रम स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "महिलांना फक्त आर्थिक मदत पुरवणे पुरेसे नाही; त्यांना त्यांची क्षमता सिद्ध करता येईल, असे व्यासपीठही आवश्यक आहे." त्यांनी ‘लाडकी बहिण योजना’, झिरो बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा, आणि महिला बचत गटांसाठी उपलब्ध ३४ वेगवेगळ्या कर्ज योजनांची माहिती दिली.
महिलांसाठी बँकेमार्फत ‘प्रोडक्ट ऑर्डरिंग’, ‘मार्केटिंग’, आणि प्रशिक्षण या बाबींमध्ये सहकार्य मिळेल, असेही त्यांनी आश्वासन दिले. याशिवाय, मुंबै बँकेच्या सर्व शाखांनी पुढील ८ ते १० दिवसांत महिलांकडून व्यवसाय कल्पना संकलित करून त्यावर आधारित योजना विकसित कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानपरिषद आमदार श्रीमती मनीषा कायंदे यांनी महिलांमध्ये असलेल्या सुप्त उद्योजकतेचा उल्लेख केला.
आमदार श्री प्रसाद लाड यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघात हजारो महिलांना व्यवसायासाठी कर्ज, मशिनरी आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही धोरणे फक्त निवडणुकांसाठी नव्हेत, तर महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनासाठी आहेत, हे त्यांनी ठामपणे सांगितले.
या बैठकीस मुंबै बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, संचालक मंडळ सदस्य, तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शीतल म्हात्रे, कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, वीणा भागवत आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सहकारी बँकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून महिला सबलीकरणासाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, यावर सर्वांनी भर दिला.
प्रतिक्रिया (0)
No comments yet. Be the first to comment!